Jamun cultivation | कायम मागणी असणारे फळ ; अशी करा जांभळांची लागवड

कोकण किनारपट्टीची ओळख जशी फणसांमुळे होते अगदी त्याचप्रमाणे जांभळासाठी सुद्धा होते. कोकणातील खास गावरान पद्धतीने उत्पादित केलेली जांभळ खाण्यासाठी खूप स्वादिष्ट असतात. कोकणामध्ये पर्यटनासाठी गेलेले पर्यटक तिथल्या टपोऱ्या व मधुर जांभळांचा आस्वाद नक्की घेतात. जांभूळ हे औषधी गुणयुक्त फळ असल्यामुळे बाजारात याला नेहमी मागणी आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधींवर जांभूळ अगदी रामबाण इलाज ठरते. हळूहळू शेतकरी वर्ग जांभूळ लागवडीकडे वळताना दिसतोय. या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत जांभूळ लागवडीपासून ते फळ मिळेपर्यंत संपूर्ण माहिती.

जांभूळ लागवडीसाठी अधिक उत्पन्न देणारी जात

देशभरात प्रसिद्ध असलेल्या कोकण कृषी विद्यापीठाने 2004 मध्ये कोकण बहडोली या नावाची जास्त उत्पन्न देणारी व फाळाचा आकार मोठा असणारी जांभळाची जात निर्माण केली आहे. कोकणामध्ये जांभूळ लागवड करायची असेल तर या जातीची लागवडीसाठी प्रथम शिफारस केली जाते.

कोकण बहडोली या जातीची जांभळ आकाराने मोठी असून (वजन 23.4 ग्रॅम) तर बियांच (वजन 3.1 ग्रॅम) असते. या जातीच्या जांभळाचा रंग हा गर्द जांभळा असतो. टिकवणुकीमध्ये सुद्धा ही जांभळ चार दिवसांपर्यंत टिकतात. साधारणपणे वीस वर्षे पूर्ण झालेल्या एका झाडापासून जवळपास 50 – 65 किलोग्रॅम पर्यंत फळांचे उत्पन्न प्राप्त होते.

वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वातावरणानुसार विविध जाती जांभळांच्या तयार करण्यात आलेल्या आहेत. पाण्याचा निचरा, हवामान, जमिनीचा प्रकार हे सर्व बघून कोणत्या जातीची जांभळीची रोप लावायला सोईस्कर असतील हे ठरवले जाते.

जांभूळ लागवड करण्याची सुबक पद्धत

जांभळाची लागवड करण्यासाठी 10 मिटर बाय 10 अंतरावरती 90 सेंटीमीटर बाय 90 सेंटीमीटर आकाराचे खड्डे खोदून करावी. खड्डे तयार केल्यानंतर प्रथम त्यामध्ये माती भरावी वरतून 2 टोपले भरून कुजलेले शेणखत टाकावे व 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट चे मिश्रण टाकावे. जांभूळ लागवड ही एप्रिल व मे महिन्यामध्ये करणे सर्वोत्तम ठरते.

जमिनीच्या प्रकारावरून खड्ड्यांचे अंतर तसेच आकार व खड्ड्यांमध्ये टाकण्यात येणाऱ्या शेणखताच प्रमाण कमी जास्त होऊ शकते. कोणत्या जातीची रोप लागवड करण्यात येत आहे यावर सुद्धा देण्यात येणाऱ्या खत तसेच इतर औषधांचे प्रमाण अवलंबून असते.

जांभूळ लागवडीनंतर योग्य खत व्यवस्थापन

लागवड केलेल्या जांभळीच्या झाडाला 1 किंवा 2 टोपले शेणखत पावसाळा सुरू होण्याच्या सुरुवातीला दरवर्षी आवर्जून द्यावे. संपूर्ण वाढ झालेल्या जांभळाच्या झाडाला प्रत्येक पाच वर्षांनी 5-6 टोपले शेणखत घालावे, एक किलो युरिया, दीड ते दोन किलो सिंगल सुपर फॉस्फेट व यासोबत 500 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे.

जांभळीच्या झाडाला हवामानानुसार तसेच झाडाच्या वयानुसार खत द्यावे लागते. लागवडीपासून सुरुवातीच्या 5 वर्षापर्यंत शेणखत किंवा गांडूळ खत देणे अधिक योग्य असते. शेणखतामुळे जांभळाचा पोत सुधारतो व तसेच रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा चांगली वाढते.

झाडांना योग्य पाण्याचे व्यवस्थापन

जांभळीची रोप लागवड केल्यानंतर सुरुवातीच्या दोन वर्षांमध्ये प्रत्येक जांभळीच्या कलमाला आठवड्यातून 20 लिटर पर्यंत पाणी द्यावे. कोकण बहडोली या जांभळाच्या जातीच्या झाडापासून जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी निर्माण झालेल्या 50 टक्के तृतीय फांद्यांवर 1 ते 2 इंच जाळ असणाऱ्या चाकूच्या मदतीने गोल काप ऑक्टोंबर महिन्यामध्ये करावे. याप्रकारे योग्य निगा राखल्यास या जातीच्या झाडांना 7-8 वर्षाच्या आसपास चांगले उत्पन्न मिळायला सुरुवात होते.

उत्पादन पूर्ण वाढ झालेल्या 15-20 वर्षाच्या एका झाडापासून 60-100 किलोपर्यंत जांभळे मिळतात. जोपर्यंत जांभळं संपूर्णपणे गळत जांभळ्या रंगाची होत नाही तोपर्यंत तोडणी करू नये. तोडणी करण्यासाठी कुठल्याही काठीचा आधार न घेता स्वतः झाडावर जाऊन काढणी करावी.

जांभळापासून बनणारे प्रक्रिया केलेले पदार्थ

जांभळाला आयुर्वेदिक औषधांमध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. जांभळापासून विविध प्रकारचे शरबत तसेच इतर उपयोगी पदार्थ बनवण्यात येतात. जांभळांचा रस काढून त्यापासून जांभळाचा ज्यूस तसेच जॅम बनवण्यात येते. जांभळीच्या बियांपासून भुकटी तयार करण्यात येते, जांभळीच्या बियांची भुकटी मधुमेहामध्ये रामबाण इलाज आहे.

भारतीय अन्नसुरक्षा कायदा व अधिकार या अंतर्गत परवानगी घेऊन जांभळांचा फळ प्रक्रिया उद्योग सुरू करता येऊ शकतो. जांभळाच्या तयार फळाला कमी दर मिळतो मात्र जांभळांपासून विविध टिकाऊ खाद्यपदार्थ तयार करून मार्केटमध्ये विकल्यास मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो.

Leave a Comment